गुरुपौर्णिमा निमित्त चंद्रपुरातील हिंदी ब्राह्मण समाजाचा ‘गुरु वंदन’ सोहळा उत्साहात
चंद्रपूर : गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी हिंदी ब्राह्मण समाज बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने बंगाली कॅम्प येथील संस्था कार्यालयात श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेच्या संगमात ‘गुरु वंदन’ महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य गुरु शंकराचार्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि पुष्पांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात केली.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनोदकुमार तिवारी म्हणाले की, भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान हे ज्ञान, संस्कार आणि जीवनदिशा देणारे आहे. गुरुंशिवाय जीवन अपूर्ण आहे. गुरु केवळ शिक्षक नसून ते समाजाला योग्य मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत. गुरुप्रती आदर व्यक्त करणे ही आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी सर्व सदस्यांना गुरुजनांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृती जतन करणे, युवा पिढीला संस्कार देणे आणि सामाजिक एकतेचा संदेश देणे यावर भर देण्यात आला.
*उपस्थित मान्यवर*
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोदकुमार तिवारी, सचिव धीरेंद्रकुमार मिश्रा, कोषाध्यक्ष कृपाशंकर उपाध्याय, सल्लागार रजनीश त्रिपाठी यांच्यासह सुरेंद्र तिवारी, पं. मथुराप्रसाद पांडे, जगदीश तिवारी, अशोक मिश्रा, अनंत तिवारी, प्रकाश पांडे, अजय मिश्रा, मनोज मिश्रा, संतोष चक्रवर्ती उपस्थित होते.
महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा संयोजिका सौ. पूनम सुभाष झा, महानगर अध्यक्षा सौ. सुमन रजनीश त्रिपाठी, महानगर उपाध्यक्षा सौ. गायत्री महेंद्र तिवारी, सौ. सविता अजय मिश्रा यांची उपस्थिती होती.
याशिवाय महानगर अध्यक्ष दुर्गेश चौबे, उग्रसेन पांडे, नरेंद्र उर्फ पप्पू मिश्रा, सुनील उर्फ मुन्ना मिश्रा, सुनीत मिश्रा, आशिष उर्फ राजा मिश्रा, प्रवीण दीक्षित, राकेश तिवारी, संदीप शुक्ला, राहुल शुक्ला, शैलेंद्र द्विवेदी, अमन द्विवेदी यांच्यासह हिंदी ब्राह्मण समाजाचे असंख्य पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक गुरु वंदना, आशीर्वचन आणि समाजाची एकता, संस्कृतीचे संरक्षण तसेच सेवा कार्ये अधिक जोमाने करण्याच्या संकल्पाने करण्यात आला. वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झाले होते.
संस्थेच्या वतीने सर्व गुरुजनांना आणि उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.







