पराग गुंडेवार यांच्याकडे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागभीड तालुका अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी

नागभीड : विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय भूमिका बजावणारे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते पराग गुंडेवार यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागभीड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. समितीचे अध्यक्ष, माजी आमदार तथा शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विशेष म्हणजे, ६ जून २०२६ रोजी पराग गुंडेवार यांची चंद्रपूर विभागीय (चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा) सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सोशल मीडिया माध्यमातून विदर्भ राज्याच्या चळवळीचा प्रचार-प्रसार, जनजागृती आणि संघटन बळकटीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर आता नागभीड तालुका अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पराग गुंडेवार यांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विविध आंदोलने, जनजागृती मोहिमा आणि संघटन विस्तारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत चळवळीला बळकटी देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे युवकांमध्ये विदर्भ राज्याच्या चळवळीबाबत जागृती निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून भविष्यातही संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीप्रसंगी माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभिये, विराआस युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मसुरकर,पूर्व विदर्भ अध्यक्ष कपील ईद्दे, प्रचार प्रमुख तात्यासाहेब मते, उपसरपंच प्रीती दिडमुठे तसेच समितीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पराग गुंडेवार यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, राजकीय व संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







