Home Breaking News लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे खरीपपूर्व शेतकरी मेळावा संपन्न

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे खरीपपूर्व शेतकरी मेळावा संपन्न

119

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे खरीपपूर्व शेतकरी मेळावा संपन्न

सुवर्ण भारत : पंकज रामटेके

पांढरकवडा : लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या वतीने दिनांक २९ मे २०२५ रोजी पांढरकवडा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा मुख्य उद्देश खरीप हंगामाचे महत्त्व समजावून सांगणे, सेंद्रिय शेती, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यासारख्या शाश्वत कृषी पद्धतींबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि बांबू लागवडीचे फायदे विशद करणे हा होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड वाय.जी.एस.प्रसाद यांनी भूषविले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून निरी (NEERI), नागपूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.लाल सिंग,निरी,नागपूरचे प्रमुख शास्त्रज्ञ,गजानन खडसे आणि चंद्रपूरचे तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने उपस्थित होते. तसेच, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे महाप्रबंधक पुलक गोयल,सहाय्यक महाप्रबंधक श्रीमती विद्या पाल,सहाय्यक महाप्रबंधक रवी जगझापे, उपव्यवस्थापक दीपक साळवे आणि इतर शासकीय अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मेळाव्यात परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सहाय्यक महाप्रबंधक श्रीमती विद्या पाल यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी खरीप हंगामातील पिकांचे योग्य नियोजन, बियाणे निवड आणि खतांचा वापर यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटक लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. घुग्घुस युनिट हेड वाय.जी.एस. प्रसाद यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फाउंडेशनने केलेल्या सक्रिय प्रयत्नांचे कौतुक केले आणि उपस्थितांना नाविन्यपूर्ण पण शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले. लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन शेतकऱ्यांन बरोबर गावातील विकास शैक्षणिक विकास कौशल विकास यावर सुद्धा काम करत राहील असे आश्वासन दिले
डॉ. लाल सिंग,प्रमुख शास्त्रज्ञ निरी, नागपूर यांनी शेतकऱ्यांना बांबू लागवड कशी करावी, जमिनीची निवड कशी करावी आणि विशेषतः सेंद्रिय शेतीचे फायदे व ती कशी करावी यावर विस्तृत चर्चा केली.
गजानन खडसे,प्रमुख शास्त्रज्ञ निरी, नागपूर यांनी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची होणारी हानी आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला. त्यांनी सेंद्रिय खतांचावापर, कंपोस्ट खत निर्मिती आणि नैसर्गिक कीटकनाशके वापरून पीक संरक्षण कसे करावे, याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
अनिकेत माने,तालुका कृषी अधिकारी,चंद्रपूर यांनी यावेळी शासनाच्या विविध कृषी योजना आणि अनुदानांबद्दल मौल्यवान माहिती दिली. त्यांनी बियाणे आणि खत अनुदान, सूक्ष्म सिंचन प्रणाली (ठिबक व तुषार सिंचन), पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPO) समर्थन कार्यक्रम यांसारख्या योजनेसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितल्या. त्यांचे हे सत्र, माहितीची स्पष्टता आणि व्यावहारिक उपयुक्ततेमुळे, विशेषतः कौतुकास्पद ठरले.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीबाबत आपले अनुभव आणि येणाऱ्या अडचणी मांडल्या. तज्ज्ञांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा कस सुधारतो, पाण्याची बचत होते आणि पिकांची गुणवत्ता वाढते, यावर जोर देण्यात आला. त्याच बरोबर शेतीविषयक स्टॉल लावण्यात आली होती
कार्यक्रमाचे संचालन स्नेहा रणदिवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनुराग मत्ते यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद चौधरी,रमण पानपट्टे, श्रीरंग पोतराजे आणि लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने यापुढेही शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करत राहणार असल्याचे सांगितले.या मेळाव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत आणि सेंद्रिय शेतीच्या महत्त्वाबाबत निश्चितच जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे आणि या मेळाव्यात शेतकऱ्यांना किचन गार्डन किट व जिवाणू खातांचे वितरण करण्यात आले.