संताजी नगर पोटदुखे ले-आऊट येथील कब्रस्तानाच्या जागेत बदल करा -नागरिकांची मागणी जोर धरू लागली!
चंद्रपूर :किरण घाटे
संताजी नगर पोटदुखे ले-आऊट येथे
2022 मध्ये कब्रस्तानासाठी नगर परिषद भद्रावतीकडे जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2023 मध्ये नगर परिषदेने
सदरहु जागा कब्रस्तानासाठी निश्चित केली. त्या वेळी त्या परिसरात कोणतीही लोकवस्ती नव्हती.
सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरे उभारली गेली असून लोकवस्ती आणि नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे त्या जागेवर कब्रस्तान झाल्यास स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. विशेषतः महिलावर्ग, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे.जनतेचा प्रश्न विचारात घेता नितीन मत्ते व युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज शहा यांच्या नेतृत्वात तसेच भारतीय जनता युवा मोर्चा (भा.ज.यु.मो)च्या वतीने नगर परिषद भद्रावतीचे मुख्याधिकारी यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले. सदरहु ठिकाण सद्य:स्थितीत कब्रस्तानासाठी अयोग्य असून दुसऱ्या मोकळ्या जागेचा कब्रस्तानासाठी विचार करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीमागे कोणत्याही समाजाविरोधातील भावना नसून, मुस्लिम समाजाच्या धार्मिक गरजांचा आदर राखून त्यांना योग्य न्याय मिळावा, तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये शांतता व सलोखा अबाधित राहावा, हाच एकमेव उद्देश आहे. प्रशासनाने सदरहु विषयाबाबत गांभीर्याने दखल घेत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देते वेळी शिवसैनिक सुरज शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, भा.ज.यु.मो.चे शहर महामंत्री योगेश खोब्रागडे, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, उपतालुका प्रमुख सुंदरसिंह बावरे, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, राज चव्हाण, संदीप चटपकर, सतीश आष्टनकर, मनोज आष्टनकर, यश निमसरकर, दीप गारघाटे आदिं उपस्थित होते.


