• गडबोरी गांव अक्षरशः हादरले बिबट्याने चिमुकल्याला घरासमोरून उचलले !
• चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढतेय …..!
• काही गावात आजही भितीचे वातावरण
सुवर्ण भारत: किरण घाटे ( विदर्भ विशेष प्रतिनीधी)
सिंदेवाही (चंद्रपूर) – सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात आज सायंकाळी हृदयदायक घटना घडली. त्यामुळे सध्या त्या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बबन मानकर यांचा पाच वर्षीय मुलगा प्रशील मानकर याला बिबट्याने घरासमोरून उचलून नेले.
या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार,असे कळते कि प्रशील हा इयत्ता दुसरीत शिकत होता. तो आई, काका व इतर कुटुंबीयांसोबत जेवण करून घराकडे परतत असताना, दोन घरांच्या सीमेवर अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. काही क्षणांतच प्रशीलला पकडून बिबट्याने थेट किल्ल्यालगतच्या डोंगराकडे नेले.
ही घटना कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर घडल्याने आई आणि नातेवाईकांनी आक्रोश केला. तातडीने आरडाओरड झाल्यावर गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यांनी मुलाच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र अंधार व काटेरी झुडपांमुळे अडथळे निर्माण झाले असून, रात्री उशिरापर्यंत प्रशीलचा ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान, वनविभागाची टीम अद्याप घटनास्थळी पोहोचायची आहे. अधिकृत शोधमोहीम सुरू व्हायची असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी , संताप अन् भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरहु घटनेमुळे गडबोरीसह संपूर्ण सिंदेवाही तालुका हादरला असून, गावकऱ्यांनी वनविभागाने तात्काळ पावले उचलून प्रशीलचा शोध घ्यावा व भविष्यातील सुरक्षेची खात्री द्यावी
अशी मागणी होत आहे.



