
#Ballarpur
• वाशिम येथे पार पडलेल्या ४६ व्या महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये बल्लारपूरच्या खेळाडूंचा सुवर्णझळाळी विजय

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी चंद्रपूर
बल्लारपुर : जिल्हा स्टेडियम, वाशिम येथे दि. २६ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ४६ व्या महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत बल्लारपूर शहरातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवत घवघवीत यश संपादन केले. राज्यभरातून आलेल्या अनुभवी मास्टर ॲथलेटिक्स खेळाडूंमध्ये बल्लारपूरच्या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई करत स्पर्धेवर आपली ठसठशीत छाप उमटवली.
या स्पर्धेत बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी अजय शाह यांनी नेत्रदीपक कामगिरी करत २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक, ४०० मीटर धावण्यात रौप्य पदक, तर ट्रिपल चेस या प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि अनुभवाचे हे यशस्वी फळ असून, त्यांच्या कामगिरीचे क्रीडाप्रेमींनी विशेष कौतुक केले.
तसेच नमोद चोखांद्रे यांनी १०० मीटर धाव आणि लांब उडी (लाँग जंप) या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांवर नाव कोरले. वेग, तंत्र आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
संतोष आत्राम यांनी २०० मीटर धावण्यात कास्य पदक, तर शॉटपुट प्रकारात रौप्य पदक मिळवून संघाच्या यशात मोलाची भर घातली.
स्पर्धेतील आणखी एक लक्षवेधी कामगिरी सुनील मांझी यांनी केली. त्यांनी ५००० मीटर वॉक रन, ट्रिपल चेस तसेच १०० मीटर अडथळा शर्यत (हर्डल्स) या तिन्ही प्रकारांत सुवर्ण पदके पटकावत प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यांची ही कामगिरी स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक मानली जात आहे.
के. जी. एन. कॉन्व्हेंटचे क्रीडा शिक्षक रमेश नातरकी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर हाय जंप व पोल जंपमध्ये सुवर्ण पदक, तर लांब उडीमध्ये रौप्य पदक मिळवले. तर वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) चे सेवानिवृत्त कर्मचारी लिंगय्या गुरजाला यांनी ट्रिपल चेस प्रकारात सुवर्ण पदक पटकावून आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.
याचबरोबर नारायण कुडे यांनी ट्रिपल जंपमध्ये सुवर्ण पदक, तर शॉटपुट आणि डिस्कस थ्रो या दोन्ही प्रकारांत रौप्य पदके मिळवत शानदार कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे बल्लारपूरच्या पदकसंख्येत आणखी भर पडली.
या सर्व खेळाडूंनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर बल्लारपूर शहराचे तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर उंचावले असून, त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, कुटुंबीय आणि विविध सामाजिक संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


