• भिवकुंड रेती घाटावर अवैध उत्खनन !
• तातडीने प्रशासनाने कारवाई करावी अतुल वाकडेंची मागणी
पोंभूर्णा (चंद्रपूर) किरण घाटे –
• पोंभुर्णा तालुक्यातील पाच-सहा घाट लिलावात

गेले आहेत. या शिवाय थेरगाव रेतीघाट सुध्दा लिलावात गेला आहे. मात्र थेरगाव घाटाच्या काहीच अंतरावर भिवकुंड परिसरात शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अवैधरीत्या रेती घाट तयार करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचीत बहुजन आघाडीचे नगरसेवक अतुल विश्वनाथ वाकडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
या अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्र, पर्यावरण व जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अवजड वाहनांच्या सतत वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे,असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
तालुका मुख्यालयापासून केवळ ३ कि.मी .अंतरावर हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असतांना महसूल प्रशासनाला याची माहिती नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .या अवैध रेती उत्खननावर कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व निवेदने सादर करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने रेती माफियांचे मनोबल वाढले आहे. परिणामी, परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील सर्व अवैध रेती घाट तात्काळ बंद करून संबंधित दोषी व्यक्ती व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकझ अतुल वाकडे यांनी स्थानिक प्रशासनाकडे एका निवेदनातून केली आहे.
जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक वाकडे यांनी प्रशासनाला दिला आहे.


