
• बसला अपघात; प्रवाश्यांचे प्राण बचावले!
• जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले!
राजुरा – (चंद्रपूर) किरण घाटे
राष्ट्रीय महामार्गावर एका बसला अपघात घडल्याची काल घडली . सुदैवाने यात कुठलीही प्राणहानी झाली नाही.या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि बुधवार
दि.३१ डिसेंबरला दुपारी ३.०० वाजता नाईकनगर गावाजवळील नवीन राष्ट्रीय महामार्गावर राजुरा आगाराची बस (MH40Y5321) अपघातग्रस्त झाली. सदरहु बस राजुराहून गडचांदूरकडे जाणारी नियमित सेवा होती.
या बसमध्ये अंदाजे १० प्रवासी होते , सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नशिबाने प्रवाश्यांना मोठी साथ दिली.त्यामुळे ते सही सलामत बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार असे समजते कि चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारामुळे बसचालकाचे अचानक नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला पलटली. अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
नाईकनगर येथील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या महिला वाहकला तुलनेने अधिक मार लागला. जखमी प्रवाशांना नाईकनगर येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून तात्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
🔲 🔲कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण!
नाईकनगर परिसरात यापूर्वीही बसचे अपघात घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे राजुरा आगाराच्या व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, बसचालकांची नियमित आरोग्य तपासणी, नशामुक्त चाचण्या, तसेच प्रवासी सुरक्षेबाबतची कठोर अंमलबजावणी या बाबी प्रत्यक्षात न राबवता केवळ कागदापुरत्याच मर्यादित ठेवल्या जात आहेत. विद्यमान आगार व्यवस्थापकाच्या कार्यकाळात प्रवाशांचे हाल वाढले असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा गंभीर आरोप नाईकनगर येथील नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत यापूर्वी मौखिक तसेच लेखी तक्रारी सूचना देण्यात आल्या असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा असे प्रवाशांचे गंभीर हाल घडल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. नाईकनगर परिसरात वारंवार अपघात होत असल्याने तातडीने ठोस व प्रतिबंधात्मक सुरक्षात्मक वाहतूक उपाययोजना राबवणे अपरिहार्य असल्याचे मत निर्भय न्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवकुमार आडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अपघातावेळी नाईकनगर येथील निर्भय न्याय प्रतिष्ठानचे प्रमोद राठोड, श्रीकांत आडे, आकाश आदे , अभिषेक राठोड, प्रफुल्ल राठोड, अनिश राठोड, कृष्णा जाधव, लखन चव्हाण, संदीप पवार, उमेश चव्हाण, आदित्य चौधरी
यांनी प्रसंगावधान राखत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढणे, रुग्णवाहिका बोलावणे व रुग्णालयात पाठविण्यास मोलाची मदत केली.


