Home Breaking News #Chandrapur • लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात...

#Chandrapur • लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न

109
Oplus_16908288

#Chandrapur
• लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

Oplus_16908288
Oplus_16908288


घुग्गुस : ग्रामीण महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या वतीने हिमोग्लोबिन (HB) तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन सहाय्यक महाप्रबंधक विद्या पाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या शिबिरात उसगाव, म्हातारदेवी, नकोडा, पांढरकवडा, वढा, शेणगाव, धानोरा, पिंपरी, बेलसणी व मुरसा या परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सचिव तसेच मोठ्या संख्येने महिला व किशोरवयीन मुली सहभागी झाल्या होत्या. ग्रामीण भागात महिलांमध्ये वाढत चाललेली रक्तक्षयाची (अ‍ॅनिमिया) समस्या लक्षात घेऊन तपासणी, प्रतिबंध व आरोग्यविषयक जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

डॉ. पायल कोंडेकर, डॉ. स्नेहा बक्षी व डॉ. मानसी पेंडकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण १,१०६ महिला व किशोरवयीन मुलींनी तपासणीचा लाभ घेतला. तपासणीदरम्यान प्रत्येकाची HB पातळी तपासून वैयक्तिक आरोग्य सल्ला देण्यात आला.

यावेळी रक्तक्षयाची कारणे, लक्षणे, संभाव्य धोके, प्रतिबंधात्मक उपाय, संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, लोहयुक्त आहाराचा समावेश तसेच नियमित आरोग्य तपासणीची आवश्यकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीनंतर गरज असलेल्या महिलांना मोफत औषधे व पूरक उपचारही देण्यात आले.

विशेष जनजागृती सत्रामध्ये किशोरवयीन मुलींना उद्देशून आहाराविषयी काळजी, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यदायी जीवनशैली, मासिक पाळीविषयक आरोग्य तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत डॉक्टरांनी सोप्या व समजण्याजोग्या भाषेत माहिती दिली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने नियोजनबद्ध व प्रभावी परिश्रम घेतले. उपस्थित ग्रामस्थ, महिला व लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.