Home Breaking News सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी क्रेसेंट पब्लिक स्कूल परिसर दुमदुमला

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी क्रेसेंट पब्लिक स्कूल परिसर दुमदुमला

88

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी क्रेसेंट पब्लिक स्कूल परिसर दुमदुमला

बल्लारपूर : महान समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाच्या जननी आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती क्रेसेंट पब्लिक स्कूल, बल्लारपूर येथे श्रद्धा, सन्मान आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सशक्तीकरणाचे मूल्य अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात अधिवक्ता नजीम खान यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व समाजसुधारणेसाठी केलेल्या ऐतिहासिक संघर्षाला अभिवादन केले. त्यांचे कार्य आजही समतामूलक समाजनिर्मितीसाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी पारुल भारणे यांनी प्रभावी भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष, स्त्रीशिक्षणातील अतुलनीय योगदान आणि सामाजिक कुप्रथांविरोधातील निर्भीड लढ्याचा सविस्तर आढावा घेतला. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून सावित्रीबाई फुले यांचे जीवन प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास क्रेसेंट पब्लिक स्कूल तसेच क्रिएटिव्ह माइंड्स प्री-स्कूल, बल्लारपूर येथील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता. शाळेच्या प्राचार्या श्रीमती हुमैरा खान यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही तितकेच कालसुसंगत असून ते आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही प्रेरणास्थान ठरला. यावेळी उपस्थित सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता व सामाजिक न्यायाच्या विचारांना आत्मसात करण्याचा संकल्प केला.