•

मिंथूर ते नागभीड विराट जनआक्रोश मोर्चा !
•शेतकऱ्यांच्या वेदनेचा हुंकार ; अन्यायाविरोधात निर्णायक लढा!
सुवर्ण भारत:नागभीड : (चंद्रपूर)
◾किरण घाटे
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, मात्र आज हाच शेतकरी अन्याय, शोषण आणि अमानवी अत्याचारांचा बळी ठरत आहे. अवैध सावकारी, आर्थिक पिळवणूक आणि मानवी अवयव तस्करीसारख्या भयावह प्रकारांनी शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असताना, या अन्यायाविरोधात आता जनआक्रोश उसळणार आहे.
रोशन कुळे या शेतकऱ्यासोबत घडलेल्या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी कहाणी समोर आली आहे. अवघ्या १ लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल ७४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. कर्जाच्या ओझ्याखाली रोशन कुळे यांनी शेती, वाहने, दागिने विकले, तरीही सावकारांची पाशवी भूक संपली नाही. अखेर परिस्थिती इतकी विदारक झाली की स्वतःची किडनी विकावी लागली. ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नसून, जगभरात सुरू असलेल्या अवैध सावकारी आणि मानवी अवयव तस्करीच्या भीषण साखळीचे भयावह वास्तव आहे.
रोशन कुळे यांनी दाखवलेल्या धैर्यामुळेच किडनी रॅकेटचा भांडाफोड झाला.
अन्यथा अनेक निष्पाप शेतकरी व इत्तर अन्यायग्रस्त अशाच प्रकारे बळी पडले असते. ही घटना केवळ एका कुटुंबाची नसून, संपूर्ण शेतकरी वर्गाच्या अस्तित्वावर घाला घालणारी आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आज दि. ३ जानेवारीला मिंथूर ते नागभीड तहसील कार्यालयापर्यंत विराट जनआक्रोश पायदळ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते माजी मंत्री बच्चू कडू, विनोद झोडगे, माजी आमदार वामनराव चटप,गिरीष नवघडे, राहुल पांडव,विनोद नवघडे ,सतीश वारजुकर,यांच्यासह विविध शेतकरी व सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी केले.
सदरहू मोर्चाच्या माध्यमातून
रोशन कुळे यांच्यावर अन्याय करणाऱ्या अवैध सावकारांवर व मानवी अवयव तस्करांवर कठोर कारवाई करावी.
◾ रोशन कुळे यांना शासकीय नोकरी देण्यात यावी.
◾शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पेन्शन, हमीभाव तसेच स्वामीनाथन आयोग लागू करा.
◾गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी तात्काळ सोडण्यात यावे.
आदि ठोस मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्यात होत्या.
हा मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी उभारलेला संघर्षाचा आवाज आहे. आता शांत बसलो तर उद्या अशी परिस्थिती आपणांवरही येईल, ही जाणीव ठेवून समाजातील प्रत्येक संवेदनशील नागरिक, शेतकरी, युवक, संघटना या लढ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाला असल्याचे आज प्रत्यक्षात दिसून आले.


