बल्लारपूरमध्ये भगतसिंग शहादत दिनानिमित्त भव्य श्रद्धांजली; युवकांमध्ये उसळला देशभक्तीचा जोश
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : दिनांक २३ मार्च शहीद-ए-आझम भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या शहादत दिनानिमित्त बल्लारपूर येथे युवान सोशलिस्ट फोरमच्या वतीने भव्य श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कुमार शंकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात एक दिवस आधी कलामंदिर गार्डन परिसरात भगतसिंग स्मारक डोम उभारून करण्यात आली. तसेच भविष्यात येथे शहीद भगतसिंग यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.
२३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य बाईक रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी उत्साहाने सहभाग घेत शहीदांना अभिवादन केले. त्यानंतर ५ ते १४ वयोगटातील मुलांसह युवकांनी सुमारे तीन तास कॅंडल मार्च काढला. या वेळी संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला आणि वातावरण देशप्रेमाने भारावून गेले.
कार्यक्रमात राजू झोडे, पवन भगत आणि कॉम्रेड प्रा. दत्ता संतोष बेटल यांनी शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देत युवकांना त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष प्रवीण कुमार शंकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, “एखाद्या माणसाला मारता येते, पण त्याच्या विचारांना नाही.”

या कार्यक्रमात सूरज अहिरवार, बाबा साहू, रिची अंबाला, रोड़ा, अशोक देशमुख, विलास कोंडावर, ओमप्रकाश शाह, शंकर झा, गणेश कोकाटे, अजय रेड्डी, सतीश, विवेक साथे, सिधू मालोजवार, शेखर, सुमित परमार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी भोजन वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून युवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.



