Home Breaking News इंदू मिल आंबेडकर स्मारकाला गती द्या; खर्चवाढीची तफावत तातडीने भरून काढा –...

इंदू मिल आंबेडकर स्मारकाला गती द्या; खर्चवाढीची तफावत तातडीने भरून काढा – बनसोडे यांची ठाम भूमिका सरकारचा पुढाकार कौतुकास्पद; ३५० फूट पुतळ्याचे काम सुरू, मात्र पूर्णत्वासाठी वेग आवश्यक

79

इंदू मिल आंबेडकर स्मारकाला गती द्या; खर्चवाढीची तफावत तातडीने भरून काढा – बनसोडे यांची ठाम भूमिका

सरकारचा पुढाकार कौतुकास्पद; ३५० फूट पुतळ्याचे काम सुरू, मात्र पूर्णत्वासाठी वेग आवश्यक

सुवर्ण भारत:गौतम कामडे

Oplus_131072

चंद्रपूर : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला गती देण्याची गरज असून, प्रकल्पातील खर्चवाढीची तफावत शासनाने तातडीने भरून काढावी, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान बनसोडे यांनी गाजियाबाद येथे सुरू असलेल्या आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात या पुतळ्याची निर्मिती सुरू असून, हेच शिल्प मुंबईतील इंदू मिल स्मारकासाठी उभारले जात आहे.

या पाहणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, उपाध्यक्ष मिलिंद मेश्राम, तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी सहभागी झाले होते.

सन २०१८ मध्ये या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र २०२६ पर्यंत प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने कंत्राटदाराला देय असलेली तफावत शासनाने तातडीने देणे आवश्यक असल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले. यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पाला गती देण्याबरोबरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत निधी वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या ३५० फूट उंचीच्या प्रस्तावित पुतळ्यापैकी सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले असून, पुतळ्याचे बूट आणि पॅन्टचा काही भाग तयार झाला आहे. उर्वरित काम गाजियाबाद येथे सुरू आहे. प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी, प्रत्यक्षात तो २०२८ पर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बनसोडे म्हणाले की, इंदू मिल येथील आंबेडकर स्मारक भविष्यात देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी प्रेरणास्थळ ठरेल. तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून त्याची ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे यांनी पत्रकारांना दिली.