वणीच्या युवकाकडून १.२५ लाखांची अवैध विदेशी दारू जप्त
स्कूटीवरून दारू नेताना आरोपी ताब्यात, वरोरा पोलिसांची कारवाई
वरोरा मार्केटमधील वाईन शॉपमधून खरेदी. युवकाकडे परवाना नाही.
वरोरा ता. प्रतिनिधी
वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान मुखबिराच्या खबरीवरून एका युवकाकडून मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ), ८१ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे (बॅ. क्र. ९२४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना मुखबिराने कळवले की, वरोरा-वणी बायपास रोडवर शगुन मंगल कार्यालयाजवळ एक व्यक्ती काळ्या रंगाच्या स्कूटीवर अवैध विदेशी दारू नेत आहे. यावरून पंचांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. दिनांक ०१/०४/२०२६ रोजी सायंकाळी ६.०५ वाजता संशयित स्कूटी (क्र. एमएच २९ बीएम ६६४९) दिसून आली. पोलिसांनी ती थांबवून आरोपीची झडती घेतली.
तपासणीदरम्यान स्कूटीच्या पुढील पायदानाजवळ प्लास्टिकच्या चुंगडीत मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली. आरोपीकडे दारूचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने नाव स्वप्निल अशोक चांदेकर (वय २९, धंदा मजुरी, रा. सेवानगर वार्ड क्र. १९, ता. वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याने कबुली दिली की, ही दारू त्याने वरोरा मार्केटमधील वाईन शॉपमधून खरेदी केली. बिना परवाना इतक्या मोठ्या प्रमाणात दारू वाईन शॉप मधून कोणत्या पद्धतीने दिली याचाही तपास पोलीस करीत आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये ओसी ब्लू, इंपीरियल ब्लू, मास्टर डिलाईट, रॉयल ग्रीन, एमसी डावेल्स, मुंबई माल्ट, आयकोनिक वाईट, रायल स्टॅग या विविध कंपन्यांच्या विस्कीच्या एकूण १२४ बाटल्या (वेगवेगळ्या क्षमतेच्या) असून तिची एकूण किंमत ३५,६१० रुपये आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कूटी (किंमत ८५,००० रुपये) व व्हिवो कंपनीचा मोबाईल (किंमत ५,००० रुपये) असा एकूण १,२५,६१० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







