“आनंद निकेतन महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी”
वरोरा:- वरोरा येथील आनंदवन स्थित आनंद निकेतन महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा.अनिल तरोळे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. एम. एम. मुंडे, तसेच प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी नीरज आत्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक प्रा.अनिल तरोळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजात शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.अध्यक्षांनी पुढे सांगितले की,आजच्या युवकांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यासाठी कार्य केले पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहून आपले भविष्य घडवावे, तसेच समाजासाठी जबाबदार नागरिक म्हणून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.तसेच प्रमुख वक्ते प्रा. एम. एम. मुंडे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रात फुले यांच्या योगदानाची माहिती दिली.
तसेच समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि विषमतेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहानी सांगितली. तसेच शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून, प्रत्येकाने शिक्षणाचा प्रसार करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असून युवकांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.
नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. तर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन खुशाल शेरकी यांनी प्रभावीपणे केले. उपस्थितांचे आभार श्रेया तळस हिने मानले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकवृंद तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. गोपाल वरुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.







