Home Breaking News घुग्घुसमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात; समाजक्रांतीच्या विचारांना उजाळा आ. जोरगेवार...

घुग्घुसमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात; समाजक्रांतीच्या विचारांना उजाळा आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादन; “फुले यांच्या विचारांची आज अत्यंत गरज” – संजय तिवारी

152

घुग्घुसमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात; समाजक्रांतीच्या विचारांना उजाळा

आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादन; “फुले यांच्या विचारांची आज अत्यंत गरज” – संजय तिवारी

घुग्घुस : थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक आणि भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त येथे आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय तिवारी यांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय तिवारी म्हणाले, “महात्मा फुले यांनी समाजातील विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धांविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. समतेचा आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या त्यांच्या विचारांची सध्याच्या काळात देशाला अत्यंत गरज आहे.”

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची क्रांती घडवून आणली. त्या काळातील तीव्र विरोध आणि सामाजिक बंधने झुगारून त्यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवला. या कार्यात उस्मान शेख आणि फातिमा शेख यांचे मोलाचे योगदान असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

शूद्र, अतिशूद्र व वंचित समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व धर्म आणि जातींना समान संधी देणारी ही चळवळ सामाजिक समतेचा मजबूत पाया ठरली. अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक परंपरांविरोधात त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

१८८८ साली त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘महात्मा’ ही उपाधी प्रदान करण्यात आली. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी सामाजिक व आर्थिक विषमतेवर तीव्र प्रहार केला असून हा ग्रंथ आजही समाजाला दिशा देणारा ठरतो.

कार्यक्रमास संजय भोंगळे, सौ. उषाताई आगदारी, सुनिता पाटील, संतोष पाटील, अनिल कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.