Home Breaking News मार्डा रोडवरील जिनिंग युनिटला भीषण आग; १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक,...

मार्डा रोडवरील जिनिंग युनिटला भीषण आग; १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक, १२ कोटींचे नुकसान

21

मार्डा रोडवरील जिनिंग युनिटला भीषण आग; १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक, १२ कोटींचे नुकसान

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी वरोरा

वरोरा : वरोरा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रविकमल कॉर्टेक्स जिनिंग अँड प्रेसिंग युनिटमध्ये सोमवारी (दि. १३ एप्रिल २०२६) दुपारी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. रोडरणे कापूस जमा करण्याचे काम सुरू असतानाच कापसाच्या गंजीला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच तिने रौद्र रूप धारण केले.

या आगीत अंदाजे १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून एक ट्रॅक्टर व इतर साहित्यही आगीच्या भक्षस्थानी सापडले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कृषी उत्पन्न बाजार समिती वणी, हिंगणघाट तसेच जीएमआर कंपनीच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, उशिरापर्यंत आग धुमसत असल्याचे दिसून आले.

दरम्यान, आग लागल्यावेळी उपस्थित असलेल्या मजूर महिला गीताबाई यांनी तत्परता दाखवत सुरुवातीला बादल्यांद्वारे पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही आग दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास लागल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या जिनिंग युनिटमध्ये परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कापूस साठवून ठेवण्यात आला होता. दोन दिवसांपासून खरेदी बंद असताना कापूस जमा करण्याचे काम सुरू होते. वाढते तापमान किंवा शेजारील शेतांमध्ये लावण्यात येणाऱ्या वणव्यामुळे उडालेल्या ठिणगीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळी तहसीलदार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

बॉक्स: वणव्यामुळे वाढतो धोका

मार्डा रोड परिसरात तीन जिनिंग फॅक्टऱ्या असून आजूबाजूला शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात शेतकरी शेतातील कचरा जाळण्यासाठी वणवे लावतात. अशा वेळी उडणाऱ्या ठिणग्यांमुळे जिनिंगमधील कापसाला आग लागण्याचा धोका वाढतो आणि कोट्यवधींचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वणवे लावणे टाळणे गरजेचे आहे, असे मत उद्योजक अमोल मुथा यांनी व्यक्त केले.