डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी बल्लारपूरात पोलिसांचा दमदार रूट मार्च; सुरक्षिततेचा विश्वास, शांततेचा संदेश
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बल्लारपूर पोलीस प्रशासनाने भव्य आणि शिस्तबद्ध रूट मार्च काढत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ केली. या उपक्रमातून शांतता, सौहार्द आणि कायद्याचा सन्मान राखण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.
रूट मार्चमध्ये ६ पोलीस अधिकारी, ६२ पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड जवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बल्लारपूर पोलीस स्टेशन येथून मार्चला सुरुवात होत गोल पुलीया, महात्मा गांधी पुतळा, डॉ. आंबेडकर भवन, कॉलरी काटा आदी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी काटेकोर शिस्तीत पथसंचलन केले. या संपूर्ण मार्गक्रमणादरम्यान नागरिकांनीही पोलिसांच्या उपस्थितीचे स्वागत करत सहकार्याची भावना व्यक्त केली. शेवटी पुन्हा पोलीस स्टेशन येथे मार्चचा समारोप करण्यात आला.
या वेळी पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाहा सयाम तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रूट मार्चदरम्यान पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले. आंबेडकर जयंतीचा उत्सव शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






