Home Breaking News • शगुन लॉन परिसरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा उघड • बल्लारपुरात दोघे...

• शगुन लॉन परिसरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा उघड • बल्लारपुरात दोघे अटकेत; मुख्य सूत्रधार फरार

94

• शगुन लॉन परिसरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा उघड

• बल्लारपुरात दोघे अटकेत; मुख्य सूत्रधार फरार

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर : शहरातील शगुन लॉन परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बल्लारपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

ही कारवाई १२ एप्रिल रोजी पोलीस ठाणे बल्लारपूरच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काही इसम मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर पैशांची बेटिंग लावण्यास प्रवृत्त करत होते.

त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष शगुन लॉन परिसरात छापा टाकून फिरोज फारुख मोहम्मद (वय ३३, रा. बालाजी वॉर्ड, बल्लारपूर) व सय्यद सिकंदर सय्यद हमजा (वय ३०, रा. राणी लक्ष्मी वॉर्ड, बल्लारपूर) यांना ताब्यात घेतले. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कार्तिक खामनकर (रा. राजुरा) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

छाप्यात आरोपींकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान NICE७७७७.fun या वेबसाईटच्या माध्यमातून आयडी व पासवर्ड वापरून ऑनलाईन क्रिकेट सट्टा चालवला जात असल्याचे उघड झाले. आरोपी नागरिकांना युजर आयडी देऊन मोबाईलवरून पैशांची बेटिंग करण्यास प्रवृत्त करत असल्याचेही समोर आले आहे.

या कारवाईत सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, सत्यवान कोटनाके, मोहन निषाद, खंडेराव माने आदी पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.