Home Breaking News चंद्रपूर प्रदूषणावर अखेर ‘ऍक्शन मोड’; मंत्री पंकजा मुंडे १६ एप्रिलला प्रत्यक्ष पाहणीसाठी...

चंद्रपूर प्रदूषणावर अखेर ‘ऍक्शन मोड’; मंत्री पंकजा मुंडे १६ एप्रिलला प्रत्यक्ष पाहणीसाठी जिल्ह्यात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम; औद्योगिक प्रदूषण, नदीप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष केंद्रित

81

चंद्रपूर प्रदूषणावर अखेर ‘ऍक्शन मोड’; मंत्री पंकजा मुंडे १६ एप्रिलला प्रत्यक्ष पाहणीसाठी जिल्ह्यात

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम; औद्योगिक प्रदूषण, नदीप्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष केंद्रित

सुवर्ण भारत :शंकर महाकाली 

चंद्रपूर :औद्योगिकरणाच्या छायेत वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे या गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून, जिल्ह्यातील प्रदूषणस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दौऱ्याला आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्याची फलश्रुती मानले जात आहे.

गेल्या काही वर्षांत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलीच्या कोळसा खाणी, तसेच कोल वॉशरीजमुळे हवा, पाणी आणि जमिनीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी ११ मार्च २०२५ रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चेद्वारे हा मुद्दा ठळकपणे मांडत शासनाला धारेवर धरले होते.

त्यानंतरही त्यांनी विषयाची तीव्रता कमी होऊ दिली नाही. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कोल वॉशरीजमधील अनियमितता आणि प्रदूषणाबाबत सीबीआय चौकशीची ठोस मागणी त्यांनी केली. पुढे २४ मार्च २०२६ रोजी झरपट व इरई नद्यांच्या वाढत्या प्रदूषणावर लक्ष वेधत त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत चंद्रपूर दौऱ्याचे आश्वासन दिले होते. आता त्या प्रत्यक्ष जिल्ह्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याने प्रशासन आणि संबंधित उद्योगांवर जबाबदारीची कात्री बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दौऱ्यादरम्यान त्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, दुर्गापूर येथे प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची पाहणी करणार आहेत. बेलसणी येथील कोल वॉशरीज, तसेच गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट प्रकल्पालाही भेट देऊन प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यात येणार आहे. भिवापूर परिसरातील नदीप्रदूषणाचाही सखोल आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील प्रदूषण प्रश्न, पर्यावरणीय समतोल आणि पशुपालकांच्या अडचणी यावर उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाययोजना ठरवण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, चंद्रपूरसारख्या औद्योगिक जिल्ह्यात प्रदूषणाचा प्रश्न केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून तो थेट नागरिकांच्या आरोग्याशी, शेतीशी आणि भविष्यातील जीवनमानाशी निगडित आहे. त्यामुळे या दौऱ्यातून केवळ पाहणी न होता ठोस निर्णय आणि कडक अंमलबजावणीची दिशा मिळावी, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे.

एकूणच, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या प्रदूषण प्रश्नाला राज्याच्या प्राधान्यक्रमात स्थान मिळाले असून, आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. या दौऱ्यानंतर जिल्ह्याच्या पर्यावरणीय स्थितीत सकारात्मक बदल घडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.