Home Breaking News ‘विकसित भारत’च्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांची बांधिलकी गरजेची – राजे अम्ब्रीशराव महाराज मुलचेरा...

‘विकसित भारत’च्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांची बांधिलकी गरजेची – राजे अम्ब्रीशराव महाराज मुलचेरा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

105

‘विकसित भारत’च्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांची बांधिलकी गरजेची – राजे अम्ब्रीशराव महाराज

मुलचेरा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुवर्ण भारत शंकर : महाकाली

मुलचेरा : येथील स्वामी विवेकानंद छात्रावासात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. “विकसित भारत” हे केवळ सरकारचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे आणि विशेषतः कार्यकर्त्यांचे सामूहिक ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्ततेसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय, सजग आणि जबाबदार भूमिका निभावणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांनी राजकीय चौकटीपलीकडे जाऊन समाजसेवा, जनजागृती आणि राष्ट्रहिताच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन करत त्यांनी “राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्वतः शेवटी” हा विचार अंगीकारण्यावर भर दिला. संघटनशक्ती बळकट करण्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि कार्यक्षमता वाढीस लागते, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाप्रशिक्षण अभियानामुळे देशभरातील कार्यकर्त्यांना दिशा, दृष्टी आणि संघटनात्मक बळ मिळत असून, पक्ष अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, तालुका अध्यक्ष संजीव सरकार, जिल्हा सचिव सुभाष गणपती, प्रदेश सरचिटणीस रेखाताई डोळस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश गारघाटे, महामंत्री निखिल हलदार, नगरसेवक आशिष पीपरे, दिलीप आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य बादल शाह, विजय बिश्वास, उत्तम शर्मा, अशोक बडाल, मोंटू सरकार, तपन मल्लिक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.