धानोरा येथे लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनतर्फे विकासकामांचे लोकार्पण उत्साहात
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
धानोरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या CSR उपक्रमांतर्गत धानोरा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व हस्तांतरण समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत आरओ वॉटर एटीएम, लॉयड्स कम्युनिटी क्लिनिकअंतर्गत मोफत दवाखाना, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल तसेच देवा महिला बचत गटासाठी पापड व चिप्स निर्मितीच्या मशिन्सचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे गावातील आरोग्यसेवा, स्वच्छ पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देवा महिला बचत गटाला देण्यात आलेल्या मशिन्समुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास वाय. जी. एस. प्रसाद (युनिट हेड), प्रशांत पुरी (वरिष्ठ उपाध्यक्ष), डॉ. विद्या पाल, सरपंच विजय आगारे, उपसरपंच विनोद खेवले, ग्रामविकास अधिकारी दुधे मॅडम यांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. मान्यवरांनी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
हा उपक्रम धानोरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

