चंद्रपूरला पहिली महिला जिल्हाधिकारी; वसुमना पंत यांचे राणी सखी मंचकडून उत्साहात स्वागत
सुवर्ण भारत :किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : विदर्भातील महत्त्वाच्या चंद्रपूर जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी लाभल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे राणी सखी मंचच्या वतीने सोमवारी (दि. १३ एप्रिल) दुपारी १ वाजता उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करताना उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमात बोलताना राणी सखी मंचच्या मुख्य संयोजिका तथा समाजसेविका प्रियंका चिताडे यांनी, “जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी मिळणे ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या नेतृत्वामुळे प्रशासन अधिक संवेदनशील व परिणामकारक होईल,” असा विश्वास व्यक्त केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच सामाजिक विकासासाठी त्यांच्या कार्यकाळात अनेक सकारात्मक उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी सहसंयोजिका रुपा चालखूरे, सपना सोनपिपरे, शुभांगी भिवंगडे, अश्विनी पारशिवे यांच्यासह राणी सखी मंचच्या सदस्य महिला व तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी पंत यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्ह्यातील महिला नेतृत्वाला बळ मिळण्याच्या दृष्टीने हा क्षण प्रेरणादायी ठरला. राणी सखी मंचच्या या उपक्रमामुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







