बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई : विविध शस्त्रांसह चार आरोपी जेरबंद, १.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर, दि. १८ एप्रिल — शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या टोळीवर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन बल्लारपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी स्टाफ) पथकाला किल्ला वॉर्ड परिसरात दोन इसम हातात हत्यारे घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या आदेशाने पथकाने सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पेट्रोलिंग दरम्यान गौरव सुनील कुकुडकर आणि बालाजी उर्फ कातीक शिवा मोहुर्ले (दोन्ही रा. किल्ला वॉर्ड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत एक लोखंडी फायटर व चाकू आढळून आला.
सखोल चौकशीदरम्यान त्यांनी विष्णू भास्कर वलसा (रा. रेल्वे वॉर्ड) व अनुराग आनंदराव मातंगी (रा. श्रीराम वॉर्ड) यांना अग्निशस्त्र विक्री केल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी विष्णू वलसा यास ताब्यात घेतले तसेच अनुराग मातंगी यांच्या घरी झडती घेतली असता देशी बनावटीचे ७.६५ मि.मी. बोअरचे सिंगल बॅरेल माउजर पिस्तूल (किंमत अंदाजे ४५,००० रुपये) व चार जिवंत काडतुसे (१०,००० रुपये) जप्त करण्यात आली.
याशिवाय गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली असून एकूण १,०५,१०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी गौरव कुकुडकर, बालाजी मोहुर्ले, विष्णू वलसा आणि अनुराग मातंगी यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५, ७ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अवैध अग्निशस्त्रांचा उगम व त्यामागील हेतू काय होता, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली. या पथकात पोउपनि अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड, संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, विकास जुमनाके, सचिन अल्लेवार, तसेच इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
अशी माहिती पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.





