Home Breaking News विसापूर रेल्वे स्थानकातील बोरवेल बंद भर उन्हात प्रवासी पाण्यासाठी त्रस्त; प्रवाशांकडून...

विसापूर रेल्वे स्थानकातील बोरवेल बंद भर उन्हात प्रवासी पाण्यासाठी त्रस्त; प्रवाशांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

135

• विसापूर रेल्वे स्थानकातील बोरवेल बंद

• भर उन्हात प्रवासी पाण्यासाठी त्रस्त; प्रवाशांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : विसापूर येथील गोंडवाना विसापूर रेल्वे स्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेला बोरवेल गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. यामुळे स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

सध्या उन्हाचा कडाका वाढलेला असल्याने प्रवाशांची तहान भागवणे कठीण झाले आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत येणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. स्थानकावर नियमितपणे मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची ये-जा होत असल्याने प्रवाशांची वर्दळ कायमच असते.

या स्थानकावरून दररोज गोंदिया मेमो सकाळी ६:२२ वाजता, वर्धा मेमो ९:२५ वाजता, गोंदिया मेमो १३:३० व १४:२० वाजता, १५:४५ व १६:३० वाजता तसेच वर्धा मेमो १८:३० व रात्री २१:३० वाजता गोंदिया मेमो अशा गाड्या धावत आहेत. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांचा ओघ सुरूच असतो. त्यातच सध्या लग्नसराईमुळे प्रवाशांची संख्या आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.

मात्र स्थानकावर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने तातडीने पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

पाण्याचा प्रश्न का निर्माण झाला?

गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानकावरील हँडपंप सुरू होता. परंतु परिसरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बोरवेलमधून पाणी मिळणे थांबले आहे, अशी माहिती कंत्राटदारांनी दिली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाला कळविण्यात आले असून लवकरच दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहे.

प्रवाशांची मागणी स्पष्ट आहे – स्थानकावर तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा उन्हाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

— वैभव मेश्राम, रेल्वे कंत्राटदार