Home Breaking News इलेक्ट्रिक वाहनांच्या गोडावूनला आग; २५ दुचाकी जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

इलेक्ट्रिक वाहनांच्या गोडावूनला आग; २५ दुचाकी जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

8

इलेक्ट्रिक वाहनांच्या गोडावूनला आग; २५ दुचाकी जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सुवर्ण भारत: गौतम कांबळे
प्रतिनिधी, बल्लारपूर

बल्लारपूर : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या मलिक मोटर्स या इलेक्ट्रिक वाहनांच्या गोडावूनमध्ये मंगळवारी दुपारी भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीत सुमारे २५ दुचाकी वाहने जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज मलिक यांच्या मालकीच्या या गोडावूनमध्ये दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण करत संपूर्ण गोडावूनला वेढा घातला. यात टीव्हीएस कंपनीच्या सुमारे १५ आणि ओकाया इलेक्ट्रिक कंपनीच्या सुमारे १० दुचाकींचा समावेश होता. सर्व वाहने आगीत पूर्णपणे भस्मसात झाली.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन अग्निशामक बंब आणि पेपर मिल येथील एक बंब यांच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आग शेजारील इमारतींमध्ये पसरून मोठा अनर्थ टळला.

प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्यांमुळे आग अधिक भडकली असण्याची शक्यता अग्निशामक विभागाने वर्तवली आहे. गोडावून पूर्णपणे बंदिस्त असल्याने धूर आणि उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला आणि आग वेगाने पसरली.

या घटनेत एक महत्त्वाची बाब समोर आली असून गोडावूनमध्ये फायर एक्स्टिंग्विशर किंवा फायर अलार्म यंत्रणा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे. घटनेनंतर पोलिस व अग्निशामक विभागाकडून तपास सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.