आर्य वैश्य कुलस्वामिनी श्रीमाता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा बल्लारपूरात उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : येथील आर्य वैश्य कोमटी समाजाच्या वतीने आर्य वैश्य कुलस्वामिनी श्रीमाता कन्यका परमेश्वरी यांचा जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २६ एप्रिल रोजी श्री बालाजी मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय बोनगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महिला अध्यक्षा सौ. अमिता बोनगिरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरुष व महिला कार्यकारिणीच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी श्रीमाता कन्यका परमेश्वरी यांचे विधीवत पूजन व महाआरती करण्यात आली. महिलांनी घरून आणलेल्या ५६ भोगांच्या प्रसादाचे विशेष आकर्षण होते. मुलांसाठी बोधपर खेळ व प्रश्नावली, महिलांसाठी विविध स्पर्धा, तसेच सर्वांसाठी प्रश्नमंजुषा आणि कपल गेम्स यांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात चंद्रपूर येथील टीमकडून सादर करण्यात आलेल्या भक्ती संगीतातील बहारदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सौ. अमिता बोनगिरवार यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून श्रीमाता कन्यका परमेश्वरी यांचे संक्षिप्त जीवनचरित्र उपस्थितांना सांगितले.
शेवटी महाप्रसाद व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्याला मोठ्या संख्येने समाजबंधू-भगिनी उपस्थित राहून मातेचे आशीर्वाद घेतले. सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.







