डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीत मद्यधुंदांचा गोंधळ; पोलिसांशी हुज्जत, तिघांवर गुन्हा

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असताना काही मद्यधुंद व्यक्तींनी गोंधळ घालत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिल्याची घटना मंगळवारी उशिरा रात्री घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११.५० वाजताच्या सुमारास नगर परिषद चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठी गर्दी जमली होती. यावेळी काही युवकांनी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला.
दरम्यान, सौरभ किशोर देशभ्रतार (३३, रा. सिद्धार्थ वॉर्ड), चेतन बाळू नगराळे (३५) व मिलिंद किशोर नगराळे (४२, दोन्ही रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड) यांनी मद्यप्राशन करून पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ केली. ‘आम्हाला कायदा शिकवू नका’ अशी दमदाटी करत त्यांनी पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचे समोर आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग करण्याचाही प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२१, २९६, ३(५) तसेच मद्यनिषेध कायदा कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे करीत आहेत.






